जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अजित निंबाळकर)
आजरा तालुक्यातील उत्तुर येथे १०० प्रशिक्षणार्थी क्षमतेचे राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे.महसूल विभागाच्या सहमतीने जिल्हाधिकारी,कोल्हापूर यांच्यामार्फत निकषानुसार आवश्यक व सुयोग्य जागा निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी प्रस्तावित केल्याप्रमाणे शासन मान्यतेने वेळोवेळी आवश्यक तेवढी पदनिर्मिती करण्यास आणि पदे भरण्यासही यावेळी मान्यता देण्यात आली.या तांत्रिक प्रशिक्षण केंद्रासाठी एकूण रुपये २५२.०३५ कोटी (अनावर्ती खर्च रुपये २००.१५ कोटी व पहिल्या पाच वर्षांकरिता आवर्ती खर्च रुपये ५१.८८५ कोटी) इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली.तसेच,पाचव्या वर्षानंतर पुढील प्रत्येक वर्षी आवश्यक आवर्ती खर्चासाठी प्रति वर्ष सुमारे रूपये ११.०२ कोटी इतका निधी उपलब्ध करून देवून त्याप्रमाणे खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
नवीन अध्यापक,वैद्यकीय अधिकारी तसेच परावैद्यक कर्मचारी यांचे करीता राज्यस्तरीय वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण केंद्र स्थापन होणार आहे.वैद्यकीय शिक्षण,संशोधन,आयुष व परावैद्यक क्षेत्रामध्ये देशात तसेच जागतिक स्तरावर दिवसेंदिवस आधुनिक तंत्रज्ञान,माहिती उपलब्ध होत असते.तसेच वेगवेगळ्या आजारावर नियमित संशोधनही होत असते.याबाबतची अद्ययावत माहिती शासकीय वैद्यकीय,दंत,आयुष व परावैद्यक महाविद्यालये व रुग्णालयातील कार्यरत वैद्यकीय अधिकारी,अध्यापक तसेच परावैद्यक अधिकारी,कर्मचारी यांना सहजरित्या उपलब्ध होत नाही.याकरिता त्यांना देश,राज्यपातळीवरील विविध परिषदा, कार्यशाळेस वैयक्तिकरित्या उपस्थित राहून संबंधित विषयांबाबत अद्ययावत माहिती व प्रशिक्षण मिळवावे लागते.यशदा प्रशिक्षण संस्थेच्या धर्तीवर वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग अंतर्गत राज्यातील वैद्यकीय शिक्षण व संशोधन तसेच आयुष संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय,दंत, आयुष महाविद्यालय व रुग्णालयातील अध्यापक,वैद्यकीय अधिकारी तसेच परावैद्यक अधिकारी,कर्मचारी यांना प्रशासकीय कामकाजाव्यतिरिक्त संबंधित क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, माहिती तांत्रिक प्रशिक्षण देण्याकरिता राज्यस्तरावर स्वतंत्र वैद्यकीय तांत्रिक प्रशिक्षण संस्था स्थापन करण्यात येत आहे. ज्यायोगे,संबंधित क्षेत्रातील शिक्षण,संशोधन व आरोग्यसेवा याचे श्रेणीवर्धन व बळकटीकरण होण्यास मदत होईल.असे मत वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केले.