सांगली जिल्ह्यात 4 डिसेंबर 2024 पर्यंत मनाई आदेश जारी.--सांगली जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी.!--

0

जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.

(अनिल जोशी)

सांगली जिल्ह्यात विधानसभा निवडणूक-2024 च्या पार्श्वभूमीवर व विविध आंदोलने,आगामी सण,उत्सव, जयंतीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित रहावी या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सन 1951 च्या महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार सांगली जिल्हा स्थलसिमा हद्दीत दि.20 नोव्हेंबर 2024 ते 4 डिसेंबर 2024 अखेर पर्यंत खालील कृत्ये करण्यास मनाई केली आहे.

आदेशात म्हटले आहे.शस्त्रे,सोटे,तलवारी,भाले,दंडे,बंदुका, सुरे,काठ्या अथवा लाठ्या किंवा शारिरीक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे,कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे किंवा क्षेपणास्त्रे किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे,जमा करणे आणि तयार करणे,व्यक्तीचे अथवा प्रेते किंवा आकृत्या किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, जाहीरपणे घोषणा करणे,गाणी म्हणणे,वाद्ये वाजविणे या कृत्यांना मनाई केली आहे.तसेच ज्याच्या योगाने शांतता व सुव्यवस्था आणि सार्वजनिक मालमत्तेस धोका निर्माण होईल किंवा सभ्यतेला बाधा येईल अशा पध्दतीने हावभाव करणे,फलक चित्रे किंवा चिन्हे तयार करणे,त्यांचे प्रदर्शन करणे आणि प्रसारीत करण्यास मनाई केली आहे.जिल्ह्यात परवानगीशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर एकत्र जमण्यास मनाई केली आहे. 

हा आदेश कायदेशीर कर्तव्य बजावीत असलेल्या शासकीय कर्मचारी,धार्मिक विधी,अंत्यविधी व परीक्षा यांना लागू राहणार नाही.हा आदेश दि.20 नोव्हेंबर 2024 रोजीचे 00.01 वाजल्यापासून ते दि.4 डिसेंबर 2024 रोजीचे 23.59 वाजेपर्यंत अंमलात राहील,असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी जारी केले आहेत.

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top