जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
महाराष्ट्र राज्यात महायुतीच्या सत्ता स्थापनेनंतर, विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनात,पहिल्याच दिवशी 173 आमदारांनी शपथ घेतली असून,महाविकास आघाडीच्या सदस्यांनी बहिष्कार टाकला आहे.आज विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनात विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी,विधिमंडळ सदसत्वाची 173 सदस्यांना,आमदारकीची शपथ दिली आहे.आज राज्यातील विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस पक्ष यांच्या एकाही सदस्याने आमदार पदाची शपथ घेतली नाही.
आज राज्यातील विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला ,"वंदे मातरम" आणि "महाराष्ट्राच्या गीताने" प्रारंभ झाला असून,संपूर्ण सभागृहात महायुतीच्या आमदारांनी," जय श्रीराम"," जय भवानी जय शिवराय" चा घोष करत सभागृह दणाणून सोडले. विधिमंडळाच्या हंगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी, राज्यपालांच्या अस्थायी अध्यक्षपदाच्या पत्राचे वाचन करून,विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही 9 डिसेंबरला होणार असल्याचे सांगितले आहे.महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या सर्व आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून,विधानसभागृहात प्रवेश केला.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अनुक्रमे पाचव्या,सहाव्या व सातव्या क्रमांकावर शपथ घेतली असून,सुरुवातीस पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमदार चैनसुख संचेती यांनी आमदारकीची शपथ घेतली.महायुतीच्या सर्व सदस्यांनी विधानसभागृहात सर्वत्र भगवे फेटे व गुलाबी फेटे परिधान केले होते.एकंदरीत आज महाराष्ट्र राज्यातील महायुतीच्या 173 आमदारांना, विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सदस्यत्वाची शपथ दिली गेली आहे.