जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
हुपरी (ता.हातकणंगले) येथील कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे हुपरी पोलीस ठाणे यांच्यावतीने सुरक्षित ऊस वाहतूक अभियान संपन्न झाले.यावेळी हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन सरगर यांनी मार्गदर्शन केले.त्यामध्ये त्यांनी उपस्थितांना खालीलप्रमाणे सूचना दिल्या.
बैलगाडी,अंगद ट्रॅक्टर,ट्रॅक्टर व ट्रक या वाहनांच्या पुढच्या बाजूस पांढ-या व मागील बाजूस लाल रंगाची रिफ्लेक्टर पट्टी व मागील बाजूस रिफ्लेक्टर पडदा वाहनधारकांना कारखान्यामार्फत दिला जातो ते लावणे बंधनकारक आहे,वाहनांवरती रिफ्लेक्टर लावलेने ऊस वाहतूक करणा-या वाहनांच्या मागून येणा-या इतर वाहनांना त्यांच्या समोरील ऊसाचे वाहन सहज दिसून येते.यामुळे रस्त्यावरील अपघात टाळून सर्वांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होते.एक साधा रिफ्लेक्टर अनेकांचे अनमोल जिव वाचवू शकतो,वाहनांमध्ये क्षमते एवढाच ऊस भरावा,ऊस वाहतूक करताना मोबाईलचा वापर करू नये,मद्यपान करून वाहन चालवू नये,रिकामे वाहन बेदरकारपणे चालवू नये.तसेच ऊस वाहतूक वाहनात टेपरेकॉर्डर व स्टेरिओचा वापर करु नये,
आपल्या वाहनांची आरटीओ कागदपत्रे,वाहनाचा विमा व वाहनचालकाचा परवाना अद्ययावत असणे आवश्यक आहे,आपल्या वाहनाची तसेच ट्रॉली पिन व टर्न टेबल इत्यादीची नियमीत देखभाल ठेवावी जेणेकरून आपल्या वाहनांतील बिघाडामुळे अपघात होणार नाहीत,हुपरी गावातून रूई व पट्टणकोडोली मार्गे ऊस भरून येणारी वाहने आणि कारखान्यावरून रिकामी होवून जाणा-या ऊस वाहनांची वाहतूक ही बायपास मार्गानेच करणेची आहे.या सर्व नियमांचे पालन करून रस्त्यावरील ऊस वाहतूक सुरळीत ठेवून आपले व सामान्य नागरिकांचे अनमोल जिवन सुरक्षित ठेवण्याचे महत्वाचे काम करावे. यामुळे आपले व सामान्य नागरिकांचे कुटुंबिय सुखा-समाधानात राहतील.
कारखान्याचे व्हा.चेअरमन बाबासो चौगुले म्हणाले, कारखान्यामार्फत प्रतिवर्षी सुरक्षित ऊस वाहतूक अभियान आयोजित करुन सर्व वाहनांना कारखान्याकडून प्रत्येक वर्षी रिफ्लेक्टर व रिफ्लेक्टर पडदे पुरविले जात असलेबाबत सांगीतले. या अभियानासाठी पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे,सहा. पोलीस उपनिरीक्षक विजय कनाके,कॉन्स्टेबल एकनाथ भांगरे, जनरल मॅनेजर अॅडमिन,उपमुख्य शेती अधिकारी,फॅक्टरी मॅनेजर,मॅनेजर एच.आर.,मेडीकल ऑफीसर,केनयार्ड सुपरवायझर,सुरक्षा अधिकारी आणि ऊस वाहतूक वाहन मालक व चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे स्वागत संचालक सुरज बेडगे यांनी केले.सेफ्टी ऑफीसर यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.