दत्त जयंती विशेष भाग-२
जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामींचा जन्म,आंध्र प्रदेश मधील इष्ट गोदावरी जिल्ह्यात,पिठापूर येथे झाला. परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामींच्या वडिलांचे नाव ब्रह्मश्री आप्पल्लराजू शर्मा व मातेचे नाव अखंड सौभाग्य लक्ष्मी सुमती देवी होय.परमगुरू श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामी चा जन्म भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी च्या दिवशी,यजुर्वेद शाखा आपस्तंभ सूत्र भारद्वाज गोत्र श्री कुलात झाला.
एके दिवशी पिठापूर येथे माता अखंड सौभाग्य लक्ष्मी सुमती देवी यांचे घरी श्राद्ध कर्म असताना,श्री दत्तात्रेय स्वामी हे भिक्षेसाठी अवतीर्ण झाले होते.माता सुमती देवी यांनी आलेल्या श्री दत्तात्रेय स्वामींना,पूर्वजन्मीच्या पुण्याईने ओळखून,श्राद्धकर्म ब्राह्मण भोजना अगोदर श्राद्धांनाची भिक्षा घातली.श्री दत्तात्रेय स्वामी प्रसन्न होऊन पतिव्रता माता सुमती वर मागणेस सांगितले.पतिव्रता माता सुमतीस अक्षहीन व पादहीन दोन मुले होती.त्यामुळे माता सुमतीने मला तुमच्यासारखा कुलभूषण,तपस्वी,कीर्तिमान,योगी पुत्र व्हावा असा वर मागितला.श्री दत्तात्रेय स्वामी तथास्तु म्हणत त्या क्षणी अदृश्य झाले.माता सुमतीने घडलेला सर्व वृत्तांत आपले पती ब्रह्मश्री अप्पल्ल राजू शर्मा यांना सांगितला.त्या क्षणी आनंदित होऊन ब्रह्मश्री अप्पल्ल राजू शर्मा यांनी सांगितले की- साक्षात दत्तप्रभूंनी माझी श्रद्धान्न दीक्षा ग्रहण केल्याने,माझे सर्व पिढ्यातील पितर तृप्त झाले आहेत आणि तुझ्या इच्छेप्रमाणे लवकरच पुत्रप्राप्ती होईल.यथाकालपरत्वे माता सुमतीस,कुलभूषण,तपस्वी,किर्तीमान,योगी पुत्ररत्न प्राप्ती होऊन,त्याचे नाव श्रीपाद असे ठेवले गेले.परमगुरु श्रीपादास लहानपणी चारही वेद मुखोद्गत होते.आपल्या पूर्व वचनाप्रमाणे त्यांनी माता सुमतीस उत्तरेस तीर्थचरण प्रवासास जाण्याची आज्ञा मागितली.त्यावेळी माता सुमतीस भिक्षेच्या वेळीचे पूर्वचनाचे श्री दत्तप्रभूंचे बोल आठवले व हा एक पुत्र नसून जगतपालक,जगद्वंद्य,अवलिया अवतारी पुरुष आहे हे जाणले.परमगुरु श्रीपादानी उत्तर तीर्थचरणास जाणेपूर्वी माता सुमती दिलेल्या वचनाप्रमाणे,आपल्या अमृतमय दृष्टीने,बंधुद्वयांना निरोगी,ज्ञानवंत,कुलवंत केले. वयाच्या ७ व्या वर्षी उपनयन संस्कार झाल्यानंतर,तीर्थचरण प्रवासास मार्गस्थ झाले.पुढील दत्त जयंती भाग विशेष तीन मध्ये परम गुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रय स्वामींची तपोभूमी असलेल्या व अवतार कार्याची समाप्ती म्हणजेच निजानंदी गमन केलेल्या श्रीक्षेत्र कुरवपूरची माहिती दिली जाईल.
परमगुरु श्रीपाद श्रीवल्लभ दत्तात्रेय स्वामींच्या जन्मस्थान म्हणजेच अत्यंत शक्ती स्त्रोत असलेल्या महान पीठ श्रीक्षेत्र पिठापुरातील श्री.चरणांस शरणागतपूर्वक दंडवत.