जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगलीतील अंकली-उदगाव येथे कृष्णा नदीवरील पुलावरून कार खाली कोसळून झालेल्या अपघातात पती-पत्नीसह तिघांचा मृत्यू झाला.हा राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाच्या हलगर्जीपणाचा बळी आहे.त्याला जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यबळाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
गेल्या दहा महिन्यांत जिल्ह्यात ३३४ रस्ते अपघातात ३६५ लोकांचा जीव गेला आहे.दररोज एक माणूस मरतोय. सार्वजनिक बांधकाम विभाग,राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरण, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ब्लॅक स्पॉट हटवले पाहिजेत.खड्डे भरले पाहिजेत.पुलाचा सुरक्षा कठडे केले पाहिजेत.हे होत नसेल तर प्रत्येक अपघात प्रकरणी संबंधित विभागावर गुन्हा दाखल केला पाहिजे,अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.या प्रश्नावर ‘ब्लॅक स्पॉट हटवा’ यासाठी रस्त्यावरची लढाई सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली. अपघात केंद्रांची माहिती घेऊन तेथे दुरुस्ती होईपर्यंत आम्ही पाठपुरावा करू,संबंधित कार्यालयांच्या बाहेर ठाण मांडून बसू,लोकांना या आंदोलनात सहभागी व्हावे आणि रस्ते अपघाताचे बळी टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा,असे आवाहन त्यांनी केले आहे.
ते म्हणाले,‘‘अंकली अपघातात मयत झालेल्या प्रसाद खेडेकर यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.सारे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.दोन कुटुंबांच न भरून येणारे नुकसान झाले आहे.किमान आमचा नातू वाचला तर त्याच्या तोंडाकडे बघून जगू,असे ती आजी सांगत होती.काय दोष आहे या लोकांचा.त्या पुलावर सुरक्षा कठडा करावा,याबाबत तीनवेळा वाहतूक विभागाने सूचना केली होती.खरे तर सूचनेची गरजच नाही,तो करायलाच हवा होता.ज्यांनी जबाबदारी टाळली,तेच या अपघाताचे कारनिभुत आहेत. त्यांच्यावर या तीन मृत्यूंची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. जोवर अशा पद्धतीने कायद्याचा धाक दाखवला जात नाही तोवर हे अपघात सत्र थांबणार नाही.तांदूळवाडीत तेच घडले.तिथे तिघांचा मृत्यू झाला.घर मोडून पडतंय,मुले पोरकी होताहेत,तरुण वयात महिला विधवा होताहेत,याचे गांभिर्य या विभागांना नाही.त्यांना भानावर आणायला आम्ही रस्त्यावर उतरत आहोत.ही सांगलीकरांची लढाई असेल.अंकलीतील अपघात प्रकरणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावत आहोत.’’
◾खर्च प्राधीकरणाने करावा.
अंकली पुलावर झालेल्या अपघातात गंभीर जखमी मुलासह तिघांवर उपचार सुरु आहेत.त्यांची जगण्यासाठी झुंज सुरु आहे.त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा अधिकाऱ्यांनी करावा.जर रस्त्याच्या दोषामुळे अपघात झाला तर हा नियमच बनवला जावा,अशी मागणी मी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे करणार आहे,असे पृथ्वीराज पवार यांनी सांगितले.