जनप्रतिसाद न्यूज नेटवर्क.
(अनिल जोशी)
सांगली शहरातील पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत,गेल्या अनेक वर्षापासून वारंवार शेरी नाल्याचे पाणी कृष्णा नदीच्या पात्रात मिसळत असल्यामुळे,भेडसावत असलेला गंभीर आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सांगलीतील शेरी नाल्याच्या प्रश्नावर आज पर्यंत बऱ्याच निवडणुका लढल्या गेल्या,आश्वासन दिली गेली,परंतु आजपर्यंत हा प्रश्न पूर्णतः मुळापासून सोडवला गेला नाही.
एक वर्षापूर्वी विधानसभेमध्ये कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा विषय गाजला होता.त्यावेळेला तत्कालीन मुख्यमंत्री व सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी उत्तर देताना शेरी नाला एस.टी.पी.प्लांट चा प्रस्ताव त्वरित पाठवावा.त्यास तत्काळ मंजुरी देण्यात येईल असे आश्वासन दिले होते.सदरहू एस.टी.पी.प्लांट चा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी गेले सात ते आठ महिन्यापासून प्रलंबित आहे.याबाबतीत नागरिक जागृती मंचच्या वतीने पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे.परंतु अजूनही यातून काहीही ठोस निर्णय निष्पन्न झालेला दिसत नाही.
सांगली शहरातील राजकीय पक्षांचे कार्यकर्ते,सामाजिक कार्यकर्ते,नागरिक जेव्हा जेव्हा या प्रश्नावर आवाज उठवतात,त्यावेळेला जुजबी काम होऊन फक्त आश्वासन दिले जाते.गेले दोन दिवस सांगलीतील कृष्णा नदीच्या पात्रात शिरीनाल्याचे प्रदूषित पाणी मिसळत असलेबद्दल, सांगली शहरातील नागरिकांचे कडून व नागरिक जागृती मंचच्या वतीने पाठपुरावा केला असता,सदरहू शेरी नाल्यावर उपसा करण्यासाठी सध्या परिस्थितीत एकच मोटर कार्यरत असल्याचे दिसून आले आहे.
सांगली शहरात जीवनवरदायिनी ठरलेल्या कृष्णा नदीचे पाणी प्रदूषित होण्याचे गांभीर्य प्रशासनाच्या अद्यापही लक्षात आले नाही काय?. सद्यस्थितीत कृष्णा नदीच्या पात्रात शेरी नाल्याचे प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत आहे.महाराष्ट्र शासनाने सांगली शहराच्या आरोग्याच्या या गंभीर प्रश्नात लक्ष घालून तत्काल एस.टी.पी.प्लांट मंजूर करावा व सद्यस्थितीत शेरी नाल्यावर मोठ्या प्रमाणावर मोटरी चालू करून,कृष्णा नदीत मिसळणारे शेरी नाल्याचे प्रदूषित पाणी त्वरित बंद करण्यात यावे अशी मागणी आज नागरिक जागृती मंच व सांगली शहरातील नागरिकांनी केली असून,सद्यस्थितीतील कृष्णाच्या पात्रातील प्रदूषित पाण्याचे कॅन भरून,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना पाठवण्यात आले आहेत असे नागरिक जागृती मंचच्या वतीने व नागरिकांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
सदरहू आरोग्याच्या गंभीर प्रश्नबाबतीत स्थानिक प्रशासनाने व महाराष्ट्र शासनाने त्वरित लक्ष घालून,सांगली शहरातील नागरिकांच्या जीवितास निर्माण झालेला गंभीर आरोग्यविषयक प्रश्न कायमचा त्वरित सोडवावा असे आवाहन नागरिक जागृती मंचचे नेते सतीश साखळकर, उमेश देशमुख,महेश खराडे,संजय चव्हाण,मोहन चोरमुले, अविनाश जाधव,मयूर बांगर,अवधूत गवळी,गोपाळकृष्ण मर्दा इतर सांगली शहरातील नागरिकांनी केले आहे.